ब्रासिलिया – ब्राझिलमध्ये दरडी कोसळल्यामुळे किमान 12 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझिलमधील मिनास गेराईस प्रांतात ही दुर्घटना घडली. संततधार पावसामुळे दरडी कोसळण्याची घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे ब्राझिलमधील धरणांच्या स्थितीवरही देखरेख केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरडी कोसळल्यामुळे मिनास गोरेन प्रांताची राजधानी बेलो होरिझोन्तो पासून जवळ डोंगरपायथ्यापाशी एकाच कुटुंबातील पाचजण गाडले गेले होते. ढिगाऱ्याखाली हे सगळे गाडले गेले असल्याचे बचाव पथकाला आढळून आले.
साओ गनालो डो रिओ अबाईक्सो शहरातही भिंत पडल्यामुळे 10 वर्षांची एक मुलगी ठार झाली. याशिवाय एका बारवर प्रचंड दरड कोसळल्यामुळे एक युवक ठार झाला. तर कार्टिंगा शहरात अशाच घटनांमध्ये आणखीन तिघे ठार झाले. एकूण 145 महापालिकांच्या हद्दींमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत 17 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. गुरूवारनंतर पावसाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज आहे.