सोमाटणे ( ब. रा. पाटील ) – मावळात ज्वारीच्या पिकाबरोबर आंतरपीक म्हणून पूर्वी शेतकरी हमखास करडईचे पिके घेत होते. त्यामुळे या परिसरात करडई तेल जेवणात सहज उपलब्ध असायचे. उत्पादन चांगले मिळत असल्याने तेलाचे आणि पेंडीचे दरही सर्वसामन्यासाठी आटोक्यात होते. परंतु अलीकडील काही वर्षात करडईचे पिके घेण्याचे प्रमाण कमी झाले. सध्या बोटावर मोजण्याइतपत देखील शेतकरी हे पीक घेत नाहीत. त्यामुळे मावळातून करडई पीकच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, कासारसाई, चांदखेड परिसरातील लाल पिवळ्या फुलांनी करडईची शेती येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत असे. ज्वारीचे पिक काढल्यावर हे पिक काही दिवसांनी काढायला येई असे या भागातील ज्येष्ठ शेतकरी सांगतात. करडईपासून तेल तयार केले जात असे आणि हेच तेल शेतकरी वर्षभर वापरत होते. काही शेतकरी घाण्याद्वारे तेल काढणाऱ्यांना करडई विकत होते. प्रत्येक गावात एक किंवा बाजारपेठेच्या गावात तेलाचा घाणा असायचा. परंतु आता तेलही राहिले नाही आणि घानाही शेवटच्या घटका मोजत आहे. एकेकाळी शुध्द करडईचे तेल सहज उपलब्ध होत होते ते आता दुरापस्त झाले आहे. पूर्वी तेल काढल्यानंतर उरलेल्या चोथ्यापासून जनावरांसाठी पेंड बनवली जायची. जी जनावरांसाठी अगदी पोषक असायची. हिवाळ्यात तर प्रत्येक शेतकरी आपल्या जनावरांना ही करडी पेंड खावू घालायचाच! शिवाय याची भाजी सुद्धा बाजारात विकत मिळायची ती सुद्धा सध्या मिळणे कठीण झाली आहे.
असा आहे दर
करडी पेंड आज बाजारत अगदी तुरळक ठिकाणी विकायला उपलब्ध आहे . तेही 5 हजार ते ६ हजार रुपये क्विंटल दराने विकली जात आहे. तेल २५० ते ३०० रुपये किलो आहे. जरी महाग असले तरी त्याची चव आणि दर्जा उच्या असेल तर लोक घेतात कारण आज आरोग्यासाठी दर्जेदार आहार असणे महत्वाचे आहे.असे मानणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे.
करडई पिक कमी होण्याची कारणे
मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुबत्ता आल्याने
नगदी पिकाची सवय लागल्याने.
करडईच्या तुलनेत बाकी पिके कमी कष्टाची
मुबलक पाण्यामुळे दुसऱ्या पिकाकडे ओढा
महाग मजुरी व कामासाठी मजुरांची कमतरता
करडई पिक घेण्यामागचे फायदे
करडईला काटे असल्याने प्राण्यांपासून नैसर्गिक संरक्षण
हे पीक चोरी होण्याची भीती नाही
करडई तेल आरोग्यास लाभदायक.
कितीही दिवस तेल खराब होत नाही
कितीही वर्ष घरात साठवून ठेवता येते
उत्पादन कमी आणि ग्राहक जास्त
तुटवड्यामुळे विकला जाण्याची खात्री