ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बावडा येथे केली कारवाई : तीन घरफोडीचे गुन्हेही उघडकीस
रेडा- कृषी माल, खते व शालेय पोषण आहाराचा माल असलेली गोदामे लुटणाऱ्या पाच जणांच्या अट्टल टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. बावडा (ता. इंदापूर) येथून सोमवारी (दि. 27) मध्यरात्रीच्या सुमारास या टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून वालचंदनगर, इंदापूर व टेंभूर्णी (जि. सोलापूर) या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
टोळी प्रमुख ऋषीकेश किसन चव्हाण (वय.24, रा. लवंग ता. माळशिरस, जि.सोलापूर), संदीप जितेंद चव्हाण (वय 21), योगेश चांगदेव गुटाळ (वय 24, दोघेही राहणार तांबवे, ता. माळशिरस जि.सोलापूर), उज्वल धनंजय निंबाळकर (वय 20, रा. पंधारवाडी ता. इंदापूर) व विशाल सुरेश थोरात (वय 20, रा. रेडणी ता. इंदापूर) असे जेरबंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
इंदापूर-अकलुज रस्त्यावरील इंदापूर बाजार समितीच्या आवारातील एक खताचे गोदाम 15 दिवसांपूर्वी चोरट्यांनी फोडून त्यातील दीड लाख रुपये किंमतीचे खत चोरुन नेले होते. या बाबतचा तपास सुरू असताना, अशाच प्रकारे दहा दिवसांपूर्वी चोरट्यांनी पुन्हा एकदा इंदापूर बाजार समितीच्या आवारातील एका दुकानाचे दरवाजाचे तोडून खताच्या गोण्या चोरल्याची घटना उघडकीस आली होती. केवळ पाच दिवसांच्या अंतरात बाजार समितीच्या आवारातील दोन दुकाने फुटल्याने, वरील प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने सरू केला होता. तर गोदाम लुटणारी एक टोळी सोमवारी रात्री बावडा परीसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे
दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, प्रवीण मोरे, गुरु गायकवाड, ज्ञानेश्वर क्षीरसागर, काशिनाथ राजापुरे यांनी बावडा परिसरात सोमवारी मध्यरात्री सापळा रचला होता. यात वरील पाचही जण अलगद सापडले.
दरम्यान ऋषीकेश चव्हाण व त्याच्या सहकाऱ्यांनी वालचंदनगर, इंदापूर व टेंभूर्णी (जि. सोलापूर) या तिन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी तीन गोदामे लुटल्याची कबुली आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेले आहे. आरोपींनी आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबतचा पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे करीत आहेत.
- यू ट्यूब ठरला त्यांचा गुरू
बावडा येथून पडकडण्यात आलेले पाचही आरोपी हे महाविद्यालयीन युवक असून गोडावूनचे शटर व कुलूप तोडणे याची माहिती त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून घेतल्याचे सांगितले. दिवसा गोडावूनची माहिती काढून पाहणी करून एकमेकांना व्हॉटसऍप मार्फत गुगल लोकेशन शेअर करून रात्रीचे वेळी एकत्र जमून पाळत ठेवायचे व चोरी करायचे.