नाशिक – करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होऊ शकता,े असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ज्ञांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य डॉक्टरांना करण्यात येईल, असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टरांना दिले.
करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना संभाव्य धोका लक्षात घेता करावयाच्या उपाययोजनांबाबत आज इंडियन ऍकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स संघटनेच्या डॉक्टरांनी नाशिक येथील कार्यालयात छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली.
छगन भुजबळ म्हणाले, बालरोग तज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये बालरोग तज्ज्ञांनी प्रशासनाला सहकार्य करून या तिसऱ्या लाटेत आपली महत्वपूर्ण अशी भूमिका पार पाडावी, असे आवाहन करत डॉक्टरांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
बालरोग तज्ज्ञांकडून छगन भुजबळ यांना विविध मागण्यांचे निवेदनही दिले. या निवेदनात लहान मुलांमध्ये डेक्सामेथासोन, इमुनोग्लोबुलीन, पॅरॅसिटॅमोल यासह लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत, लहान मुलांना एको कार्डीयोग्राफी ही तपासणी करणारे तज्ज्ञ उपलब्ध असावे यासह विविध मागण्या त्यांनी केल्या आहे.