पिंपरी, दि. 23 – भोसरी ते मॅगझिनदरम्यान अशास्त्रीय पद्धतीने तयार केलेले कमी-अधिक उंचीचे स्पीडडब्रेकर अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. याशिवाय पथारीचालकांच्या अतिक्रमणांमुळेदेखील अपघाताला आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे हे सर्व स्पीडब्रेकर व पथारीचालकांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भोसरी- मॅगझीन यादरम्यान मॅगझीण ते बनाचा ओढ्यापर्यंत सहा स्पीडब्रेकर आहेत. यापैकी एकही स्पीडब्रेकर समान उंचीचा नाही. तर अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे रस्ता खोदल्याने स्पीडब्रेकरला समांतर खड्डेदेखील निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे स्पीडब्रेकर व कड्डे चुकवत वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे.
वास्तविक पाहता, भोसरी आळंदी दरम्यानच्या या रस्त्याचे रुंदीकरण झाले नसून, रस्ता दुभाजकदेखील नसल्याने सुमारे पंचवीस ते तीस फूटांच्या रस्त्यावरुन अहोरात्र वाहनांची वर्दळ सुरू असते. तर गजानन महाराज मंदिरापासून बनाचा ओढ्यापर्यंत बेकायदेशीर रित्या पथारीचालकांनी व्यवसाय थाटले असल्याने हा रस्ता अरुंद झाला असून, त्यामुळेदेखील अपघाताचा धोका वाढला आहे. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची पूर्वकल्पना या विक्रेत्यांना मिळत असल्याने कारवाईचा नुसताच फार्स होत असल्याचे आरोप स्थानिक नागरिक करत आहेत