गोंदिया – ओबीसी आरक्षणासंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येण्याची शक्यता आहे. हा निकाल ओबीसींच्या बाजूनेच असेल, असा विश्वास राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. यामुळे ओबीसी आरक्षणावरील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
गोंदिया येथे पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी हा विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजीत बैठकीनंतर ते बोलत होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावर सुनावणी सुरू आहे. यावर उद्या न्यायालयाकडून येणारा निकाल हा ओबीसींच्या बाजूने लागेल असा विश्वास आहे. या प्रकरणी इम्पिरिकल डेटाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रं सादर करून वेळ मागितला आहे. आपल्या शेजारील मध्यप्रदेश राज्यावर हेच संकट आले असता केंद्र सरकारने त्वरित प्रतिज्ञापत्रं देत न्यायालयाला वेळ मागितला, असे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे मागास आयोग ही स्वायत्त संस्था असून आम्ही त्यांच्या खात्यात 5 कोटी रुपये टाकले आहेत. त्यांनी त्याचा वापर कसा करावा हे त्यांनी स्वत: ठरवावे. तसेच सरकार व आयोगात कोणतेही मतभेद नसून सर्व काम सुरळीत सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.