ऊस क्षेत्र घटल्याने दराचा प्रश्‍न ऐरणीवर

मागील वर्षापेक्षा 50 टक्‍क्‍यांनी दर घटला
नगर  (प्रतिनिधी) – उसाचे क्षेत्र मागील वर्षापेक्षा 50 टक्‍क्‍यांनी घटल्याने दराचा विषय ऐरणीवर आला असून, दर वाढवून द्या, शिवाय काटा पेमेंट (रोख पैसे) देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र आतापर्यंत चांगला दर व वेळेवर पैसे देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेल्या कारखान्यांना उसाची अडचण येणार नाही, असे साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाचे मत आहे.

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जसे वाढत गेले तशी साखर कारखान्यांची संख्याही वाढत गेली. जिल्ह्यात 14 सहकारी व 9 खासगी साखर कारखाने आहेत. जिल्ह्याला मागील वर्षी दुष्काळाचा फटका बसला आहे. पाण्याअभावी ऊस जळून गेला, जनावरांच्या छावण्यासाठी उसाची मोठ्या प्रमाणावर तोडणी झाली व त्यातूनही चांगल्या पद्धतीने वाढ झालेल्या उसाची आता बेण्यासाठी तोडणी होत आहे. या सर्व प्रकारामुळे उसाचे क्षेत्र 50 टक्‍क्‍यांनी घटले आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 23 पैकी 21 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यावर्षी ऊस नसल्याने 16 साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र उसाची उपलब्धता पाहिली असता 16 कारखानेही सुरू होण्याची शक्‍यता कमीच आहे. असे असले तरी एफआरपीपेक्षा अधिक दर व काटा पेमेंट देण्याची मागणी शेतकरी साखर कारखान्यांकडे करू लागले आहेत. जिल्ह्यातील सध्याचे ऊस क्षेत्र पाहता दराची स्पर्धा होईल, असा शेतकऱ्यांचा सूर असला तरी साखर कारखानदारांचेही शक्‍यतो मर्यादित कारखाने सुरू करण्यावर एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी शेतकऱ्यांकडून एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची मागणी केली जात आहे.

दराचे अगोदर बोला, मगच ऊस मागा असे जाहीरपणे शेतकरी ठणकावून सांगत असल्याचे साखर कारखान्यांच्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. उसासाठी शेतकऱ्यांपर्यंत आमचे कर्मचारी गेल्यानंतर अगोदर दर जाहीर करा व काटा पेमेंट देण्याची मागणी शेतकरी करीत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र ज्या कारखान्यांनी आतापर्यंत चांगला दर, वेळेवर पैसे दिले व शेतकऱ्यांना चांगली वागणूक दिली, अशा कारखान्यांनी उसाची फार अशी अडचण येणार नाही, असे सांगण्यात आले. दरम्यान, कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात असलेला ऊस व कृषी विभागाकडे असलेल्या ऊसाचे क्षेत्र यात मोठी तफावत आहे. कारखान्यांनी शेजारच्या तालुका वि जिल्ह्यातून ऊस आणला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कारखाने सुरवातील बाहेरच्या ऊसाचे गाळप करून कार्यक्षेत्रातील ऊसाला प्राधान्य देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.