मुंबई महापालिका आणि जलसंपदाच्या पदभरतीमुळे इच्छुकांची पंचाईत
पिंपरी – सरकारी पदभरतीला गेल्या काही वर्षांपासून मुहूर्त लागत नसल्याने अडचणीत आलेल्या इच्छुकांच्या अडचणीत प्रशासकीय यंत्रणेचे आपल्या ढिसाळ कारभाराने भर घातली आहे. येत्या 25 नोव्हेंबरला एकाच दिवशी दोन परीक्षा घेण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांची मोठी पंचाईत झाली आहे.
अभियांत्रिकी विभागाच्या विविध पदभरतीच्या परीक्षेला रविवार दि. 24 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. मात्र, विविध विभागांच्या भरती परीक्षेच्या तारखेतच घोळ झाल्याने अनेक इच्छुकांकडून संताप व्यक्त होत आहे. दि. 24 नोव्हेंबरपासून एमपीएससीची राज्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या केंद्रावर होत आहे. तर सोमवार दि. 25 नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (जेई) पदासाठी मुंबईत परीक्षा होणार आहे. या सोबतच दि.25 नोव्हेंबर व 26 नोव्हेंबरला जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (जेई) पदासाठीची परीक्षा जिल्ह्यांच्या ठिकाणी होणार आहे.
अभियांत्रिकीच्या या तीनही परीक्षा वेगवेगवळ्या ठिकाणी लागोपाठ आल्या आहेत. यातील एमपीएससीची परीक्षा सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे पदवीधर देऊ शकातात. तर बीएमसी कनिष्ठ अभियंत्याची परीक्षा सिव्हील आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीचे पदवीधर देऊ शकतात.
या परीक्षेसाठी कित्येक दिवसांपासून मेहनत घेतली होती. अभ्यास केल्यानंतरही प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयाच्या अभावी एकाच दिवशी दोन परीक्षा आल्यामुळे आम्हाला एका परीक्षेवर पाणी सोडावे लाणार आहे. याबाबत संबंधित विभागाला माहिती दिल्यानंतरही आतापर्यंत कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे, मेहनत घेतल्यानंतरही परीक्षा देता न येणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे.
– केदार घोगरे, उमेदवार