नागपूर – करोनाच्या साथीदरम्यान महाराष्ट्रामुळे करोनाची साथ अन्य राज्यांमध्ये पसरली, असे पंतप्रधानांनी म्हणून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. या बद्दल पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, या मागणीसाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गडकरींच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कॉंग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचेही स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने गडकरींच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले होते.
पंतप्रधान मोदी हे “महाराष्ट्र विरोधी’ असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. कॉंग्रेसचे स्थानिक आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जोपर्यंत पंतप्रधान महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागत नाहीत तोपर्यंत कॉंग्रेस पक्ष दररोज निदर्शने करत राहील, असे महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी सांगितले होते.
संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली होती. करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कॉंग्रेस कार्यकर्ते रेल्वे आणि बस स्थानकांबाहेर उभे राहून माघारी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना घाबरवण्याचे काम करत होते, असा आरोप पंतप्रधानांनी केला होता.