शशिकांत भालेकरबाजार समितीच्या संचालकांचे राजीनामा प्रकरण; सुजित झावरे यांचं दबावतंत्र!
ना. विजय औटी यांना होणार फायदा
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभेसाठी सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, नीलेश लंके हे प्रमुख दावेदार आहेत. झावरे यांच्याकडून गायकवाड यांच्यावर दबावतंत्र म्हणून संचालकांनी राजीनामे दिले असल्याचे बोलले जात आहे. त्यात शिवसेनेने देखील राष्ट्रवादीतील बंडाळीला अंतर्गत फोडणी लावली असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून सध्या फक्त ना. विजय औटी यांची उमेदवारीसाठी निश्चित असल्यामुळे त्यांना निवडणूक सोपी जाण्यासाठी हे फायद्याचे ठरणार आहेत.
पारनेर – पारनेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उफाळली असून, त्याचाच परिपाक म्हणजे बाजार समितीच्या नऊ संचालकांचे सामूहिक राजीनामे होय. हे राजीनामा धक्कातंत्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत पारनेर तालुक्यात संघर्ष करावा लागेल. झावरे गटातील बाजार समितीच्या उपसभापतिंसह नऊ संचालकांच्या राजीनाम्यामुळे झावरे हे इतर पर्यायांच्या शोधात असल्याची चर्चा असून, तालुक्यात राजकीय भूकंप करतील का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना पारनेर बाजार समितीतील राजीनामानाट्याने राष्ट्रवादीतील खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत तालुक्याच्या राजकारणामध्ये दिसणार आहे, हे निश्चित. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर विश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. तो बारगळला. त्यानंतर गायकवाड यांचे सह्यांचे अधिकार देखील काढून घेण्यात आले होते. त्यादरमानच्या घडामोडी सर्वश्रुत आहेतच.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे व बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यात बेबनाव सुरू आहे. गायकवाड यांनी राजीनामा देऊन इतर संचालकांना संधी द्यावी, अशी भूमिका झावरे यांनी गेल्या काही दिवसांपासून मांडली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्वाला देखील त्याची कल्पना वेळोवेळी देण्यात आली होती. परंतु तोडगा निघत नसल्याने या नऊ संचालकांनी जिल्हा निबंधकांच्या नावे राजीनामापत्र सह्या करून सुजीत झावरे यांच्याकडे दिले आहेत. झावरे हे अजित पवार यांच्याशी चर्चा करून त्यानंतर राजीनामे जिल्हा निबंधकाकडे देतील, अशी माहिती आहे. झावरे यांचे हे दबावतंत्र मानले जात आहे. ते नाराज असून, येत्या काही दिवसांत आपली वेगळी राजकीय भूमिका स्पष्ट करू शकतात.