इस्लामाबाद, – पाकिस्तानमध्ये कट्टरवादी तेहरीक ए लबाईक पाकिस्तान या बंदी घातलेल्या संघटनेची गोठवलेली बॅंक खाती पुन्हा खुली करण्याचा निर्णय पाकिस्तानातील इम्रान खान सरकारने घेतला आहे. ही खाती खुली करण्याचे तत्वतः मान्य करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे. दोनच दिवसांपूर्वी याच संघटनेच्या 350 सदस्यांना तुरुंगातून सोडण्यात आले आहे.
तेहरीक ए लबाईक पाकिस्तान ही संघटना पंजाब प्रांतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी संघटना आहे आणि या संघटनेला राजकारण करायचे आहे, ही बाब आता मान्य करायला पाहिजे, असे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. या संघटनेबरोबर सरकारला कोणताही संघर्ष नको आहे. रोजच्या रोज होणारे वाद सरकारला संपवायचे आहेत, असे रशीद यांनी म्हटले आहे.
संघटनेने सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये संघटनेच्या सदस्यांची सुटका करणे आणि संघटनेला प्रतिबंधित संघटना घोषित करणारा राज्य मंत्रिमंडळाचा पूर्वीचा निर्णय रद्द करण्याचा समावेश आहे. सरकारने या मागण्या मान्य केल्या आहेत. सरकार आपले आश्वासन पाळणार आहे, असेही रशीद म्हणाले.
संगटनेच्या दबावामुळे पाकिस्तान सरकारने सोमवारी “टीएलपी’ च्या 350 सदस्यांची तुरुंगातून सुटका केली. आता संघटनेने मान्य केल्याप्रमाणे मुरिदकेचा मार्ग दोन्ही बाजूंकजून पुन्हा खुला केला जायला पाहिजे, असेही रशीद म्हणाले. “टीएलपी’चा म्होरक्या साद रिझवी याच्या सुटकेसंदर्भातही इम्रान खान सरकार कार्यरत आहे, असेही रशीद यांनी सांगितले. रिझवी याच्या सुटकेसाठी लाहोर जवळच्या मुरिडके येथे धरणे आंदोलन करण्याचा इसारा संघटनेने दिला होता. त्यानंतर सरकारने या संघटनेच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत.