न्यूयॉर्क – उत्तर अमेरिकेत एका पार्कमध्ये बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरीला गेला आहे. कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस शहरातील गुआदाल्युप रिव्हर पार्कमधून हा पुतळा चोरीला गेला आहे. सॅन जोसच्या उद्यान विभागाने शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हा पुतळा बेपत्ता असून हा नक्की कधी चोरीला गेला हे समजू शकलेले नाही, असेही या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हा पुतळा पुणे शहराने सॅन जोस शहराला भेट म्हणून दिला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तर अमेरिकेतील हा एकमेव पुतळा होता. मात्र हा पुतळा चोरीला गेल्याने सॅन जोस शहरातील नागरिकांना खूप दुःख झाले आहे. या पुतळ्याचा शोध घेतला जातो आहे.
या संदर्भातील ताजी माहिती वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल, असेही उद्यान विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शहराच्या अधिकाऱ्यांनी या पुतळ्याच्या चोरीची दखल घेतली असून तपासासाठी जनतेला सहकार्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.