बंगळुरू – कर्नाटकातील बंगळुरू येथे 17-18 जुलै रोजी कॉंग्रेसने बोलावलेल्या दुसऱ्या विरोधी एकता बैठकीत किमान 24 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. या आधी पाटण्यात झालेल्या बैठकीत पंधरा राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर आठ राजकीय पक्षांनी या आघाडीला आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. नव्याने सहभागी होणाऱ्या पक्षांपैकी दोन राजकीय पक्ष पुर्वी भाजप आघाडीत होते त्यांनी आता कॉंग्रेसप्रणित आघाडीची कास धरली आहे.
एमडीएमके म्हणजेच, मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम, केडीएमके म्हणजेच कोंगू देसा मक्कल काची,विदुथलाई चिरुथैगल काची(सीव्हीके), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लिम लीग, केरळ कॉंग्रेस (जोसेफ), आणि केरळ कॉंग्रेस (मणी) हे नवीन राजकीय पक्ष आहेत जे या बैठकीत सामील होणार आहेत. बंगळुरूच्या बैठकीला कॉंग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी देखील उपस्थित राहणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या लोकसभा निवडणुकीत केडीएमके आणि एमडीएमके हे पक्ष भाजपचे मित्रपक्ष होते.
दरम्यान, कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना पुढील एकता बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यासाठी त्यांनी सर्व संबंधीत नेत्यांना पत्रेही पाठवली आहेत. देशात सध्या लोकशाही तंत्राच्या विरोधातील पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. त्याच्या विरोधात लोकशाहीवादी पक्षांची भक्कम आघाडी उघडण्यात यश मिळत असल्याचे खर्गे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
17 जुलै रोजी संध्याकाळी 6.00 वाजता बेंगळुरू येथे बैठकीला सुरूवात होंईल. रात्रीच्या जेवणानंतरही मीटिंग सुरू राहिल. तसेच 18 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून बैठक पुढे सुरू राहील. सध्या आजारी असलेले लालूप्रसाद यादव आणि शरद पवार या नेत्यांनीही या बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.