कोपरगाव – अमेरिकेहून भारतात आल्यानंतर लगेचच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी सत्ताधारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन बुधवारी आपला पाठींबा दर्शविला. त्यामुळे राजकीय भूकंप झाल्यापासून गुलदस्त्यात असलेली आ. काळे यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अर्थात पवार कुटुंबात उभी फुट पडल्यानंतर राज्यातील अनेक आमदारांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या.काहींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तर काहींनी सत्तेपेक्षा राष्ट्रवादीचे मूळ संस्थापक खासदार शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. मोजके आमदार तटस्थ भूमिकेत होते. आमदार आशुतोष काळे विदेशात गेल्याने ते नेमेके कोणत्या पवारांना आपले करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी आमदार काळे विदेशातून आल्याबरोबर बुधवारी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेत सोबत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आठवडाभरापासून विचारात पडलेल्यांना आमदार काळे यांनी मी अजित पवारांचा समर्थक आहे.हे आज पुन्हा एकदा सिद्ध केले.
वास्तविक पहाता मतदारसंघाच्या शेजारी असलेल्या शहा-पांचाळे येथील भर सभेत अजित पवार यांच्या साक्षीने मला जलसंपदामंत्री करावे अशी आशा आ. काळे यांनी बोलून दाखवली होती. कदाचित अजित पवारांमुळे आ. काळे यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकेल, असा अंदाज कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान पवार कुटुंबातील सलोख्याचे संबंध असणारे काळे कुटुंबीय आहे. स्व.माजी खासदार शंकरराव काळे यांच्यापासून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शरद पवार आणि काळे कुटुंब हा वेगळा जिव्हाळा राज्यात निर्माण झाला.त्याला अनुसरूनच रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या प्रमुखपदी आमदार आशुतोष काळे यांची शरद पवार नियुक्ती केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याशी आशुतोष काळे यांचे ऋणानुबंध असताना हि काळे अजित पवार यांच्या गटात गेल्याने चर्चेला उधान आले आहे.
आमदार आशुतोष काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क साधला प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही. त्यामुळे ते नेमके कोणती भूमिका घेवून अजित पवार यांच्या गटात सामील झाले हे स्पष्ट झाले नाही तरी सत्ताधारी पक्ष आणि अजित पवार हेच काळे यांना जवळीक वाटले असावे. मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे आशुतोष काळे यांच्याबरोबर असल्याने काळे ज्या गटात तोच पक्ष आमचा असा नारा सुरु झाला आहे.
कोपरगाव मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आज मुंबई येथे अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून त्यांना पाठींबा दिला. आदरणीय शरद पवार हे आमचे दैवत आहे. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत. याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव मतदार संघातील मतदारांचा पूर्ण पाठींबा राहील, याची मला खात्री आहे. अश्या आशयाची पोस्ट आमदार आशुतोष काळे यांनी सोशल मिडीयावर टाकून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.