नवी दिल्ली – देशातील पाच निमलष्करी दलांमधील करोनाबाधित जवानांची संख्या मंगळवारी 779 इतकी झाली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) एका अधिकाऱ्याचे कोलकत्यात करोना संसर्गामुळे निधन झाले. त्यामुळे निमलष्करी दलांमधील करोनाबळींची संख्या 6 वर पोहचली आहे.
सीआयएसएफसह देशात एकूण पाच निमलष्करी दले आहेत. त्यामध्ये सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी यांचा समावेश आहे. त्या दलांमध्येही करोनाने शिरकाव केल्याची घडामोड चिंताजनक मानली जात आहे. निमलष्करी दलांचा विचार करता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) सर्वांधिक 288 करोनाबाधित जवान आढळले आहेत. त्यापाठोपाठ सर्वांत मोठे दल असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 243 जवानांना करोनाची लागण झाली आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस दलात (आयटीबीपी) 159 करोनाबाधित आढळले आहेत.
सीआयएसएफमधील 68 जवानांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाला आहे. तर सशस्त्र सीमा बलातील (एसएसबी) 21 जवानांना त्या विषाणूची बाधा झाली आहे. करोना संसर्गाने आतापर्यंत सीआयएसएफमधील तिघांचे निधन झाले आहे. बीएसएफमधील दोघांचा तर सीआरपीएफमधील एकाचा करोनाबाधेमुळे मृत्यू झाला आहे.