नवी दिल्ली – देशातील नव्या करोना रुग्णांची दैनंदिन संख्या आता केवळ 25 हजारांवर आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 25 हजार 72 नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. मार्च 2020 पासूनची ही सर्वात नीचांकी संख्या आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यानच्या काळात एकूण 389 करोना रुग्ण दगावले असल्याने देशातील एकूण करोना मृतांची संख्या 4 लाख 34 हजार 756 इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रिय बाधितांची संख्या 3 लाख 33 हजार 924 इतकी झाली आहे. करोनाचा रिकव्हरी रेट आता 97.63 टक्क्यांवर गेला आहे. काल अखेरपर्यंत देशातील 58 कोटी 25 लाख जणांना करोना लसींची किमान एक तरी डोस देऊन झाला आहे.