वॉशिंग्टन – तालिबानला अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करता यावी यासाठी पाकिस्तान आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणांनी मदत केली, असा आरोप अमेरिकेतील एक ज्येष्ट रिपब्लिकन संसदपटू स्टीव्ह चाबोट यांनी केला आहे.
हिंदू पॉलिटिकल ऍक्शन कमिटीच्या एका बैठकीत बोलताना त्यांनी हा आरोप केला. अफगाणिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांना भारतात प्रवेश देण्याचा भारत सरकारच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले.
ते म्हणाले की, अमेरिकन व नाटो फौजांनी तेथून माघार घेण्याचे ठरवल्यानंतर पाकिस्तान आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणांनी पद्धतशीर रणनिती आखून तालिबान्यांना सत्ता ताब्यात घेण्यासाठी जी मदत केली ती पाहणे अत्यंत दुर्दैवी ठरले आहे. त्यांनी आपल्या देशात तालिबानच्या विजयाचा जल्लोष केला असेही ते म्हणाले.
पाकिस्तानने आपल्या देशातील धार्मिक अल्पसंख्यकांच्या हिताकडे अजिबात दुर्लक्ष केले आहे. अमेरिकेने हा मुद्दा नजरेआड करता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. हिंदू मुलींना जबरदस्तीने तेथे इस्लामची दीक्षा दिली जात आहे. हिंदू मुलींना धर्मांतर करून वृद्धांशी विवाह करण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. हे आरोप केवळ ऐकीव नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.