पिंपळे गुरव, दि. 4 (वार्ताहर) – रामकृष्ण चौकातील पेरूच्या बागेच्या रस्त्याच्या कडेला दुतर्फा मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन येथील परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महापालिकेचे आरोग्य विभाग डोळे झाक करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पेरूच्या बागेच्या रोडवर नर्मदा गार्डनकडे जाताना डाव्या बाजूला अंतर्गत रस्त्याच्या साफसफाईकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. परिसरात साफसफाई होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यात शहरात डेंगीचे, तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने येथील रस्त्याच्याकडेची साफसफाई त्वरित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोग्य विभागाला येथील साफसफाई करण्याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील कर्मचारी व अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
डेंग्यू, मलेरिया, हिवताप यासारखे आजार फैलावत असताना प्रशासनाकडून जनजागृती करीत नागरिकांना स्वच्छतेबाबत आवाहन करीत असतात. मात्र संबंधित प्रशासनच याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिक डासांच्या उत्पत्तीमुळे भयभीत झाले आहेत. संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित येथील वाढलेले गवत काढून टाकण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
याबाबत नुकतीच माहिती मिळाली. सदर ठिकाणी पाहणी करून घेते. वाढलेले गवत असल्यास त्वरित कर्मचारी लावून त्या परिसरातील गवत काढण्यात येईल. तसेच डासांची उत्पत्ती होत असल्यास सदर परिसरात औषध फवारणी देखील करून देण्यात येईल.
– धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक.