कॅलिफोर्निया – चीनमध्ये जानेवारी महिन्यात करोना विषाणूंची संख्या जितकी सांगितली गेली होती, त्यापेक्षा ती 37 पट अधिक होती, असे अमेरिकेतील “आरएएनडी’ या थिंकटॅंकने म्हटले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव जेंव्हापासून जगभर सुरू झाला, तेंव्हापासून अनेक संस्था, संघटनांकडून या विषाणूच्या फैलावासाठी चीनला जबाबदार धरले जात आहे.
या विषाणूचा उगम आणि त्याबाबतची माहिती लपवल्याचा आरोप चीनवर चहोबाजूंनी केला जातो आहे. “आरएएनडी’ने या साथीच्या काळात झालेल्या व्यवसायिक विमान वाहतुकीच्या डाटाच्या विश्लेषणाच्या आधारे चीनमध्ये दाखवली गेलेली रुग्णांची आकडेवारी प्रत्यक्षातील रुग्णसंख्येपेक्षा किमान 40 पट कमी होती, असा दावा केला आहे. चीनने पहिल्यापासून आपली रुग्णसंख्या सर्व जगापासून दडवून ठेवली असल्याचे पुरावे आपल्याजवळ असल्याचेही या थिंक टॅंकने म्हटले आहे.
22 जानेवारी 2020 रोजी चीनमध्ये दाखवली गेलेली रुग्णांची संख्या आणि त्याच काळात जपान, थायलंड, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि तैवानमधील रुग्णांची संख्या पाहता चीनमधील संख्या कमी करून दाखवली गेली असल्याचे लक्षात येते.
31 डिसेंबर 2019 ते 22 जानेवारी 2020 पर्यंत चीनमध्ये दररोज सरासरी 172 रुग्ण सापडत होते. हे प्रमाण चीनमधील 8.2 दशलक्ष लोकसंख्येमागे केवळ 1 इतके होते. याच काळात जपान, थायलंड, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि तैवानमध्येही करोनाचा फैलाव झपाट्याने वाढत होता. याच काळात चीनमधून 8.2 दशलक्ष नागरिक या पाच देशात गेले होते. हेच लोक जर चीनमध्येच राहिले असते, तर तेथील रुग्णसंख्या प्रचंड वाढलेली दिसली असती. पण या 23 दिवसात चीनमधील रुग्णसंख्या अत्यल्पच दिसत होती. पण या 5 देशांमधील रुग्णांची संख्या मात्र वाढलेली दिसत होती, असे निरीक्षण “आरएएनडी’ने केले आहे.
चीनमधून जपान आणि थायलंडमध्ये किमान 10 लाख प्रवासी गेले होते. तर 7 लाख 50 हजारापेक्षा थोडे अधिक दक्षिण कोरिया, 5 लाख अमेरिकेत आणि 4 लाखापेक्षा थोडे कमी लोक तैवानला रवाना झाले. हे सर्व मिळून 37 लाखांच्या आसपास प्रवासी चीनमधून रवाना झाले.
याच काळात या 5 देशात करोनाचे रुग्ण आगोदरच सापडायला सुरुवात झाली होती. त्यानंतर चीनमधील रुग्णसंख्या घटायला लागल्याचे दिसून आले. जेंव्हा चीनमध्ये सरासरी 172 रुग्ण सापडत होते. तेंव्हा जपान, तैवानमधील रुग्णसंख्येत 9 टक्के वाढ दिसून आली. या देशांमध्ये 13 लाखांमध्ये 1 टक्का रुग्ण आगोदर मिळत होते. मात्र हे रुग्ण चीनमध्येच असते तर चीनमधील रुग्णसंख्या 37 पट अधिक दिसली असती, असेही या थिंक टॅंकने म्हटले आहे.