बॅंकिंग, वाहन क्षेत्रांची पिछेहाट; गुंतवणूकदारांना सवलतींची अपेक्षा
मुंबई : पासून काही क्षेत्रांना काही भागामध्ये काम करू दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बुधवारी सकाळी शेअर बाजार निर्देशांकामध्ये बरीच वाढ झाली होती. मात्र दुपारनंतर विक्री वाढत गेली आणि दिवसाखेर शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 310 अंकांनी कमी होऊन 30,379 अंकांवर बंद झाला. तत्पुर्वी दिवसभर 1346 अंकाचे चडउतार झाले. तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 68 अंकांनी कमी होऊन 8,925 अंकावर बंद झाला. आज बॅंकिंग क्षेत्राने सपाटून मार खाल्ला. कामकाजाच्या गेल्या दोन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत.
एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, कोटक महिंद्रा, मारुती-सुझुकी, हिरो मोटो कार्प या कंपन्यांच्या शेअरचे भाव बुधवारी घसरले. बुधवारी वाहन आणि बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले तर ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक वाढले. सध्या छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा असल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे तुलनेने कमी नुकसान झाल्याचे दिसून आले.
सध्याच्या परिस्थितीबाबत विश्लेषकांनी सांगितले की, जोपर्यंत परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत गुंतवणूकदार फारसे जोखीम घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. नकारात्मक घडामोडींमुळे गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. सध्या निर्देशांक बऱ्याच खालच्या पातळीवर आहेत. मात्र ते आणखी किती कमी होतील याचा अंदाज गुंतवणूकदारांना येत नाही. उद्योग क्षेत्राला शक्य तितक्या लवकर सवलती मिळण्याची गरज आहे. मात्र केंद्र सरकारकडून या सवलती जाहीर होत नसल्यामुळे गुंतवणुकदार निर्णय घेत नसल्याचे चित्र बाजारात आहे.