मेलबर्न – आंतरराष्ट्रीय क्रिकेट ज्या देशाकडून खेळण्याचे भाग्य लाभले त्याच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा प्रशिक्षक बनलो तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा होता, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक व माजी कसोटीपटू जस्टिन लॅंगर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिन वॉर्नर आणि कॅमेरून बॅंक्रॉफ्ट हे तिनही खेळाडू चेंडू कुरतडल्याप्रकरणी दोषी आढळले होते. त्यांच्यावर एक वर्षाची बंदीही लावली गेली होती.
या घटनेनंतर लॅंगर यांना प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले होते. त्याचवेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच देशात 2-1 असा पराभव करत ऐतिहासिक मालिका विजय साकार केला. ही मालिका गमावल्यानंतर संपूर्ण संघाला एक इशारा मिळाला की संघाचे गेले दोन दशके असलेले जागतिक क्रिकेटवरील वर्चस्व खालावले आहे. या पराभवाने खूप नैराश्य आले होते. माझ्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यातून बाहेर येताना खूप वेदना झाल्या. मात्र, आता सर्वकाही अलबेल आहे, खेळाडूंना त्यांची जबाबदारी समजली आहे.