जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन जाहीर करत सिनेमागृह बंद करण्यात आली. यानंतर आता जेथे करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे जिथे पुन्हा जनजीवन हळूहळू मार्गावर येत आहे. न्यूझीलंडमध्येही करोनावर नियंत्रण मिळविण्यात आले असून येथील चित्रपटगृहे पुन्हा सुरू होणार आहेत. विशेष म्हणजे न्यूझीलंडमध्ये चित्रपटगृहे अजय देवगणच्या “गोलमाल अगेन’ या चित्रपटाने पुन्हा सुरू होणार आहेत.
याबाबत रोहितने इन्स्टाग्रामवर माहिती शेअर करत म्हटले की, न्यूझीलंडने “गोलमाल अगेन’ पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. “कोविड-19′ साथीच्या आजारानंतर रिलीज होणारा तो पहिला चित्रपट ठरेल. न्यूझीलंड आता करनोनामुक्त झाला आहे आणि “गोलमाल अगेन’सह 25 जूनपासून चित्रपटगृह सुरू होत आहेत.
“गोलमाल अगेन’मध्ये अजय देवगणसह अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा, प्रकाश राज आणि नील नितीन मुकेश मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात परिणीती चोप्राने मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे.
अजय देवगणच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, “भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ आणि “मैदान’ हे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. परंतु भारतात लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व चित्रपटगृह बंद असल्याने सर्व शेड्यूल बिघडले आहे.