पुणे – कोरोनानंतर मनसोक्तपणे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुन्हा एकदा तरुणाई रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरा मोठी गर्दी पाहायला मिळाली. विद्युत रोषणाईसह मोठ्या आनंदात पुणेकरांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. नवीन वर्षाचे स्वागत करताना नवे संकल्प घेऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी नतमस्तक होण्याकरता गणेश भक्तांनी रविवारी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. ट्रस्टतर्फे पहाटे पाच वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
गणरायाचे मनोहारी रूप डोळ्यात साठविण्यासोबतच नववर्षाच्या पहिल्या दिवशीचे बाप्पाचे रूप मोबाईल मध्येही अनेकांनी यावेळी कैद केले. नवे वर्ष सर्व गणेश भक्तांना आणि भारतीयांना सुख समृद्धी आणि आनंदाचे जावो, अशा शुभेच्छा यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या आहेत.भल्या पहाटे थंडीची परवा न करता लाईनमध्ये लागून भक्तांनी मनोभावे बाप्पाचे दर्शन घेतल्याचे यावेळी दिसून आले.
वाहतुकीत बदल
नववर्षाच्या पहिल्या दिवशी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रविवारी (दि.1) मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर जड, अवजड व पीएमपी बस यांना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. याबाबतचे आदेश वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले आहेत.
श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती व मध्यवर्ती भागातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी रविवारी 1 जानेवारी 2023 रोजी अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून जड, अवजड वाहने, पीएमपी बस यांना छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्त्यावर वाहतुकीसाठी बंद असणार आहेत, रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून ते गर्दी संपेपर्यंत हा आदेश लागू असणार आहे.
बंद असणारे मार्ग…
बाजीराव रस्ता – पुरम चौक ते शनिवारवाडा
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता – स.गो.बर्वे चौक, महापालिका भवन, गाडगीळ पुतळा, शनिवारवाडा, रामेश्वर चौक पुढे इच्छितस्थळी
पर्यायी मार्ग…
पुरम चौकातून टिळक रस्ता, टिळक चौकातून इच्छितस्थळी
स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्त्याने इच्छितस्थळी