मुंबई – अभिनेता कार्तिक आर्यनने अल्पावधीतच उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. करियरच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. मात्र त्याने अखेर बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. मात्र सध्या त्याची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. आर्यनने विमानाच्या इकोनॉमी क्लासमधून प्रवास केला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कार्तिकने इतर स्टार्सप्रमाणे बिझनेस क्लास किंवा प्रायव्हेट जेट घेण्यापेक्षा सामान्य लोकांबरोबर इकोनॉमी क्लासने प्रवास केला. . यावेळी त्याला पाहून प्रवासीही चकित झाले होते. कार्तिकच्या व्हायरल व्हिडीओवर ‘हा चित्रपट प्रमोट करण्याचा नवा ट्रेंड सुरू आहे.’ ‘त्याचा नवा चित्रपट रिलीज होत आहे,’ अशा कमेंट केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी कार्तिकचं कौतुकही केलं आहे. याआधी दीपिका पदूकोण, विकी कौशलने इकॉनॉमी क्लासमधून प्रवास केला होता. ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनी रिक्षामधून प्रवास केला होता.
दरम्यान, कार्तिक आर्यनच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 29 जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘भूल भुलैया-2 ‘या चित्रपटात याआधी हे एकत्र दिसले होते. त्यानंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे. त्यांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.