पिंपरी, दि. ६ – भोसरीतील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे रुग्णालय समस्येच्या गर्ते अडकले आहे. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच सुरू असलेली कामे धीम्या गतीने चालू आहेत. तातडीक विभागाच्या छताची दुरवस्था झाली आहे. तर रुग्णालयातच चादरी व कपडे वाळविण्यासाठी ठेवण्यात येत आहेत. याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा त्रास येणाऱ्या रुग्णांना होत आहे.
महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रूपये खर्चून भोसरी येथे नवीन रुग्णालय उभारले आहे. मात्र योग्य सुविधा देताना त्याकडे दुर्लक्षच होताना दिसत आहे. रुग्णालयात अद्यापही रुग्णांचा ओघ कमीच आहे. त्यामध्ये गैरसोयीची भर पडत असल्याने रुग्ण नाराजी व्यक्त करत आहेत. या रुग्णालयात प्रवेश करण्यासाठी तीन प्रवेशद्वाराची सुविधा देण्यात आली आहे. सध्या एकच प्रवेशद्वार रुग्णांसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरीत दोन प्रवेशद्वारासमोर धीम्या गतीने कामे सुरू करण्यात आली आहेत. रस्त्यामध्येच पाईपलाईन टाकण्यात आली आहेत. त्याचा त्रास ये-जा करणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होत आहे.
रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर तातडीक विभाग लागत आहे. या ठिकाणी रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचारासाठी पुढे दाखल केले जाते. या तातडीक विभागाच्या छताच्या भागाचीच दुरवस्था झाली आहे. छत जीर्ण झाले असून पाणी गळती होत आहे. रुग्णांची तपासणी करताना त्यांना त्याचा त्रास होत आहे. या बरोबरच रुग्णालयाच्या पायऱ्यांवर असणाऱ्या अँगलवर रुग्ण व त्यांचे नातेवाईक चादर, कपडे वाळत आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत.