नागपूर – ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी दाखल झाल्यावर भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनकडून धोका कसा कमी होइल यासाठी जीवाचे रान करत आहे. मात्र, तरीही त्यांनी अश्विनचाच सर्वात जास्त धसका घेतल्याचे आता त्यांच्या सरावातून तसेच वक्तव्यांवरून उघड होत आहे.
हरभजनसिंगच्या जागी काही वर्षांपूर्वी भारतीय संघात पदार्पण केलेल्या अश्विनने हरभजनप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची त्रेधा उडवली आहे. त्याची आकडेवारीच हे सांगत आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत 18 कसोटी सामने खेळताना तब्बल 89 बळी मिळवले आहेत. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात काय किंवा ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात खेळत असेल तर अश्विनसमोर त्यांचे फलंदाज नांगी टाकतात हे वारंवार सिद्ध झाले आहे.
आता यंदाच्या मालिकेत अश्विनच्या गोलंदाजीचा यशस्वी सामना कसा करायचा यासाठी सध्या त्यांचा संघ विविध फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीवर फलंदाजीचा सराव करत घाम गाळत आहे. त्यांनी अश्विनप्रमाणेच ऑफ स्पीन गोलंदाजी करत असलेल्या भारताच्या महेश पिथियालाही सराव सत्रात बोलावून त्याच्या गोलंदाजीवरही सराव करण्याचे सुत्र हाती घेतले होते. इतके सगळे करुनही त्यांची अश्विनबाबतची भीती अद्याप कमी झालेली नाही.
ऑस्ट्रेलिया संघातील सर्व प्रमुख फलंदाज सध्या नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत आहेत. त्यातही भारतातील स्थानिक फिरकी गोलंदाज व ऑस्ट्रेलिया संघातील फिरकी गोलंदाज त्यांना विविध चेंडू टाकत त्यावर फलंदाजी कशी करायची याचे धडे देत आहेत. मात्र, तरीही यातील एकही गोलंदाज अश्विनच्या दर्जाचा नाही हेच आता त्यांच्या वक्तव्यांवरून समोर येत आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचे संघ व्यवस्थापन तसेच त्यांचे आजी-माजी क्रिकेटपचू बीसीसीआयवर टीका करत माइंड गेमही खेळत आहे. ही ऑस्ट्रेलियाची जुनी वृत्ती असून प्रत्येकवेळी त्यांचा संघ भारतात आल्यावर ते याचा प्रयोग करतात मात्र, तरीही पराभूतच होतात.
ऑफ स्पीनची भीती जास्त
ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बूताला बीत नाहीत इतके ऑफ स्पीन गोलंदाजीला घाबरतात असे म्हटले जाते. सध्या त्यांची वक्तव्ये पाहता त्यात तथ्य असल्याचेही समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाला ऑफ स्पीन गोलंदाजी खेळताच येत नाही हा इतिहास अनेकदा सिद्ध झाला आहे. त्यांच्याकडे नाथन लॉयनसारखा चांगला ऑफ स्पीन गोलंदाज असूनही त्यांना भारताच्याच नव्हे तर जगभरातील ऑफ स्पीन गोलंदाजांसमोर लोटांगण घालावे लागले आहे. यष्टीच्या समोरून बाहेर जाणाऱ्या लेग स्पीन चेंडू पेक्षाही त्यांना आत वळत असलेल्या ऑफ स्पीन चेंडूची भीती जास्त वाटते हे अनेकदा सिद्धही झाले आहे. आता या मालिकेत काय चित्र दिसेल याची उत्कंठा चाहत्यांना लागली आहे.