नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आली आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, रेल्वेने आपल्या ई-कॅटरिंग सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता प्रवासी त्यांचा पीएनआर नंबर वापरून प्रवासादरम्यान व्हॉट्सऍपद्वारे ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकतात. याद्वारे भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांना ई-कॅटरिंग सेवेद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सऍप वापरण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी व्हॉट्सऍप क्रमांक +91 8750001323 सुरू करण्यात आला आहे.
सुरुवातीला, व्हॉट्सऍप कम्युनिकेशनद्वारे ई-कॅटरिंग सेवा दोन-टप्प्यांत लागू करण्याची योजना आखण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात, व्हॉट्सऍप क्रमांक ई-तिकीट बुक करणाऱ्या ग्राहकांना www.ecatering.irctc.co.in या लिंकवर क्लिक करून ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी संदेश पाठवेल. या पर्यायासह, ग्राहकांना ऍप डाउनलोड न करता थेट आयआरसीटीसीच्या ई-कॅटरिंग वेबसाइटवरून स्थानकांवर उपलब्ध त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बुक करता येतील.
सेवांच्या पुढील टप्प्यात, व्हॉट्सऍप क्रमांक ग्राहकांसाठी परस्परसंवादी द्वि-मार्गी संप्रेषण प्लॅटफॉर्म बनण्यास सक्षम असेल, ज्यामध्ये AI समर्थित चॅटबॉट प्रवाशांच्या ई-कॅटरिंग सेवांच्या सर्व प्रश्नांची माहिती घेतील आणि त्यांच्यासाठी जेवण बुक करेल. सुरुवातीला, ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या आधारे निवडक गाड्यांमध्ये ई-कॅटरिंग सेवांसाठी व्हॉट्सऍप कम्युनिकेशन लागू करण्यात आले आहे. ही सेवा कालांतराने इतर रेल्वेलाही लागू केली जाईल.