सरपंच, उपसरपंचासह ग्रामसेवक, तलाठ्यांवर कारवाईची मागणी
नगर – नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीतील गौणखनिजाची सरपंच, उपसरपंच यांच्याकडून शासनाची रॉयल्टी न भरता परस्पर विक्री केली जात आहे. ही रॉयल्टी त्यांच्याकडून वसूल करून शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांना साथ ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडली अधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस काढाव्यात या बाबतचे निवेदन जिल्हा परीषद सदस्य शरद झोडगे यांनी गृहशाखा तहसीलदार राजू दिवाण यांना दिले.
नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायत हद्दीत व गावठाणामधील स्मशानभूमी लगत असणाऱ्या नदीचे कृषी विभागाच्या योजनेतून खोलीकरणाचे काम चालू आहे. तेथून मुरूम उत्खनन होत आहे. या गोष्टीची माहिती गावचे सरपंच व इतर सदस्य यांना असून, देखील त्यांनी माहिती महसूल विभागापासून लपवून ठेवली व रॉयल्टी न भरता मुरुमाची परस्पर विक्री करत आहे. व सरकारी गौण खनिजाची परस्पर डंपर, व ट्रॅक्टरच्या सहायाने वाहतूक केली जात आहे.
सरपंच सविता पानवळकर व त्यांचे पती राम पानवळकर तसेच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी उत्खनन करून, मुरमाची रॉयल्टी न भरता परस्पर विल्हेवाट लावलेली आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना यांना कळवलेले असता, त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत ग्रामसभेत गावचे ग्रामस्थ निखिल शेलार यांनी उपस्थित केला असता, सदस्यांनी पैसे भरू असे तोंडी सांगितले. मात्र, अद्याप पैसे भरलेली नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी महेश झोडगे, सुशील कदम, निखील शेलार, शरद शिंदे, चेतन शेलार, राहुल शेलार उपस्थित होते.