वाझोली – अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कराड येथील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवार, दि. 21 रोजी ही शिक्षा ठोठावली.
संतोष चंद्रू थोरात (वय 41, रा. रूवले ता. पाटण) असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सरकार पक्षाचे वकील अँड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारोपपत्र ग्राह्य मानून न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा लागल्याने बाललैंगिक अत्याचार कायदा आणि लोकांचा न्यायालयावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे मत सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी व्यक्त केले आहे.
सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष थोरात 29 डिसेंबर 2021 रोजी एका अल्पवयीन मुलीला व तिच्या मैत्रिणीला शेतात घेऊन गेला होता. शेतातून परत आल्यावर त्या दोन्ही मुली आरोपी थोरात याच्या घराच्याबाहेर खेळत होत्या. काही वेळानंतर पीडित मुलीची मैत्रिण घरी निघून गेली. यावेळी पीडित आठ वर्षीय मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत निर्जनस्थळी नेऊन जबरदस्तीने बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केला. तसेच मुलीचा मृतदेह दरीत फेकून दिला होता. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी तपास करत संशयिताला अटक केली. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, याप्रकरणी सरकारी वकिलांचा युक्तिवाद व ढेबेवाडी पोलिसांनी सादर केलेले पुरावे व दोषारोपपत्र ग्राह्य मानून न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन तसेच पोलिसांनी सादर केलेले पुरावे व दोषारोपपत्र ग्राह्य धरून पीडितेला न्याय मिळवून दिला. या प्रकरणाच्या तपासात सहभाग घेतलेल्या सर्वांच्या प्रयत्नांचे चीज झाले. या निकालामुळे बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांना चाप बसेल.
– संतोष पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक)