पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात १८ ते ४९ वयोगटातील जननक्षम जोडपे किती आहेत, त्यांना किती अपत्ये आहेत, गर्भवती माता किती, शून्य ते ५ वयोगटातील बालके किती, असांसर्गिक रुग्ण किती ही आणि याबरोबरच इतर सर्व प्रकारची माहिती गोळा करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. यासाठी ३५० परिचारिका महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कुटुंबात जाऊन पाहणी करणार आहेत.
कुटुंब पाहणी सर्वेक्षण ३१ मेपर्यंत संकलित करून दि. १५ जूनला त्याचा अहवाल सादर केला जाईल. या आकडेवारीच्या तथ्यानुसार पुणे महापालिका आरोग्य योजनांचे नियोजन करणार असून, हे पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती ठरणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये महारपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याविषयी निर्देशांकाची इत्यंभूत माहिती संकलित केली जाईल. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याविषयी गरजांच्या प्राधान्यानुसार आरोग्य योजनांचे व सेवांचे नियोजन करणे शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कुटुंब नियोजनाच्या वापरल्या जाणाऱ्या पद्धती व गरज, संरक्षित व असंरक्षित जननक्षम जोडपी यांची माहिती या सर्वेक्षणात घेणार आहे. तसेच गर्भवती मातांच्या वेळोवेळी केल्या जाणाऱ्या आरोग्य तपासण्यांची माहिती, विशेषतः रक्तक्षयाचे प्रमाण, धनुर्वात लसीकरण स्थिती, अतिजोखमीच्या गर्भवती मातांची माहिती.
शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालके, कमी वजनाची व कुपोषित बालकांची माहिती, लसीकरणाविषयी बालकांची माहिती, गंभीर आजारग्रस्त बालके यासह असंसर्गिक रुग्ण उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, मधुमेह, श्वसनाचे आजार व कर्करोग रुग्णांची माहिती घेतली जाणार आहे.