कोपरगाव – नियतीचा खेळ काहीच निराळा असतो. कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी 20 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने घेतले. तहसीलदार अर्थात तालुका दंडाधिकारी इतरांना दंड करून पोलीस कोठडीत रवानगी करणारे आज ते स्वतः लाच घेतल्याने त्यांच्या हातात बेड्या पडल्या. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पैशाच्या मोहापायी मोठा माणुस कधी खोटा होईल, याचा काहीच भरोसा राहीला नाही. हेच या घटनेवरून सिध्द होते. दि. 19 मे रोजी शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार आनंदाने रजा टाकून 1 जून होणाऱ्या बढतीची वाट पहात घरात आराम करीत होते.कुटुंबासोबत आठ दिवस विश्रांती घेण्याच्या तयारीत होते. पण सायंकाळी साडेसातच्या दरम्यान अचानक नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सुरेगाव येथील एका वाळू तस्कराने तहसीलदार विजय बोरुडे आपल्याकडून वाळूची गाडी नियमित चालु ठेवण्यासाठी मासिक 65 हजारांची मागणी करीत होते.
तडजोडी अंती 20 हजार देण्याचे ठरले. हे पैसे तहसीलदारांच्यावतीने त्याचा खासगी पंटर गुरूमित हरणितसिंग दडियाल याच्याकडे देण्याचे ठरल्याचे सांगितले. यावरून पथकाने सापळा लावून कोपरगाव तहसील कार्यालयजवळील रसरंग कॅटींग येथे तहसीलदारांच्यावतीने पैसे स्वीकारतांना गुरुमित दडियाल याला रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता ते पैसे आपण तहसीलदारांच्या सांगण्यावरून घेतल्याचे सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बोरुडेंवर गुन्हा दाखल केला.
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार विजय बोरुडे व गुरुमित दडियाल यांच्या विरोधात शुक्रवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या दोघांना पोलिसांनी एकाच कोठडीत डांबून ठेवले होते. शनिवारी कोपरगाव न्यायालयासमोर दोघांना उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान, तहसीलदार बोरुडे यांनी कारकिर्द काही दिवसांपूर्वी चर्चेची व वादग्रस्त ठरली होती.
काही दिवसांपूर्वी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, तेथील परिचारिकेबरोबर गैरवर्तन करणे, शहर पोलीस स्टेशनमध्ये जावून धिंगाणा घालणे आदी प्रताप ताजे असताना पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने तहसीलदार बोरुडे यांचे होणारे प्रमोशन आता डिमोशनवर येवून टेकले आहे.