वाल्हे (जिल्हा पुणे) – सुकलवाडी (ता. पुरंदर) परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या सोमवारी (दि. २८) वनविभागाच्या रेस्क्यू टीमने दोन तासांच्या मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर अखेर पकडला आहे. सुकलवाडी परिसरात बिबट्याचा दोन दिवस धुमाकूळ सुरू होता. त्यामुळे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती.
त्याची वनविभागाने दखल घेतली. सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपाल राहुल रासकर, गोविंद निरडे, परमेश्वर वाघमारे, आनंदकुमार इंदलकर, सागर शिरतोडे, योगेश नजन, प्रेम दाते, हनमंत पवार, आदींसह गुरुवारी (दि. २८) सकाळी सुकलवाडी परिसरातील चिंचेचामळा परिसरातील वनविभागाची रेस्क्यू टीम दाखल झाली. दरम्यान, वनविभागाच्या जवळपास १० ते १२ जणांच्या रेस्क्यू टीमने २ तासांचे शर्थीचे प्रयत्न करून जाळीमध्ये बिबट्याला पकडले.
त्यानंतर त्याला बेशुद्ध केले व वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून पुढे नेल्याचे सुकलवाडीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नारायण पवार व संदेश पवार यांनी सांगितले. दरम्यान, रेस्क्यू टीमने पकडलेला बिबट्या अंदाजे एक वर्ष वयाची मादी असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी दिली. सुकलवाडी परिसरात उसाचे क्षेत्र असून, चिंचेचा मळा या मार्गाने येथील ग्रामस्थ, तसेच प्रवासीवर्ग येथून प्रवास करीत असतात; तसेच महिलांसह नागरिक दररोज आपापल्या शेतात कामासाठी ये-जा करीत असतात.
मागील दोन दिवसांपासून नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने मोठ्या शिताफीने बिबट्याला पकडले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, राहुल यादव, सुकलवाडीसह सरपंच जयश्री चव्हाण, माजी उपसरपंच धनंजय पवार, संतोष पवार यांसह ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन –
“या परिसरात अजून एक बिबट्या असल्याची शंका वनविभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतामध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे; तसेच जर बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्यास, वनविभागाच्या १९२६ या क्रमांकावर अथवा वनपरिक्षेत्र अधिकारी किंवा वनकर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, ग्रामस्थांनी एकट्याने फिरू नये, बिबट्याला कोणत्याही प्रकारे हुसकावू नये, रात्री – अपरात्री बाहेर पडू नका, एखद्या प्राण्यावर हल्ला केल्यास प्रतिकार करायला पुढे जाऊ नका, असे आवाहन सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण यांनी केले आहे.