नवी दिल्ली :- जागतिक कुस्ती संघटनेकडून भारतीय कुस्ती संघटनेवर निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर निवड चाचणीच्या तारखांमध्ये बदल होतील अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र, निवड चाचणी नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे, असा खुलासा भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहात असलेल्या हंगामी समितीचे सदस्य भुपेंदर बाजवा यांनी केला आहे.
हंगामी समितीकडून जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन 25 व 26 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक 7 मे रोजी होणार होती, पण केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून निवडणूक प्रकियेला सुरुवात केली त्याच दरम्यान भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून हंगामी समितीची स्थापना करण्यात आली.
मात्र, तरीही या निवडणुकीला सातत्याने विलंब झाला. आसाम कुस्ती संघटना, आंध्र प्रदेश कुस्ती संघटना, हरियाना कुस्ती संघटना यांनी विविध कारणांनी न्यायालयात धाव घेतली आणि त्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली.
आशियाई स्पर्धेत भारताचाच ध्वज…
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघटनेकडून भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्याच ध्वजाखाली खेळाडू सहभागी होणार आहेत. मात्र, जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या वतीने संघ पाठवण्यात येणार असल्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडू जागतिक महासंघाच्या ध्वजाखाली खेळतील.