मंचर- धामणी येथील कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबाची यात्रा रविवार (दि. 9) आणि सोमवार (दि. 10) होणार आहे. त्यादृष्टीने यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, मंदिर शिखराचे रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले आहे. यात्रा काळात रविवारी सकाळी आठ ते दहा देवास हारतुरे, नवसाच्या गाडंबगाडाच्या मिरवणुका, सायंकाळी सात वाजता छबिना, तसेच पालखी सोहळा आणि रात्री दहा वाजता कै. तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा कार्यक्रम होईल.
सोमवारी सकाळी आठ वाजता शाहीर रामदास गुंड आणि पार्टी कातळवेढा तुरेवाले विरुद्ध शाहीर नाना साळुंखे आणि पार्टी श्रीगोंदा कलगीवाले यांचा कलगीतुऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा आखाडा, तर रात्री नऊ वाजता मंगला बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम होईल.नुकतेच मंदिराच्या शिखराचे काम पूर्ण झाले आहे. शिखराच्या रंगकाम पूर्ण झाले आहे.
मुख्य मंदिरासह मंदिराची तटबंदी परिसरातील दीपमाळा, चिंचेखालील महादेव मंदिर, श्री गणेश मंदिर, यमाई मंदिर तांबे भगतबाबा मंदिर, बोल्हाई मंदिर, शिवाई मंदिर, संगमावरील महादेव मंदिर, रामजीबाबा मंदिर व म्हाळसाई व बाणाई यांसह तिन्ही प्रवेशद्बारांचे आकर्षक रंगकाम करण्यात आले. धामणीचे खंडोबा देवस्थान शिरूर-आंबेगाव-पारनेर-जुन्नर-खेड तालुक्यांतील अनेक गावांतील भाविकाचे कुलदैवत आहे. खंडोबा मंदिराच्या शिखराचे व मंदिर परीसराचे रंगकाम पूर्ण झाल्याने मंदिराच्या शिखर कलशारोहण कार्यक्रम ह. भ. प. प्रसाद महाराज अंमळनेरकर (गोविंदबुवा) यांच्या हस्ते होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.