देहूगाव – देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील 150 एकर गायरान जागैपेकी 50 एकर जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय देण्याचा विषय फेटाळण्यात आला. देहूचे नागरीकरण दिवसेंदिवस वाढत असून, अन्य नागरी सुविधा विकसित करण्यासाठी भविष्यात याठिकाणी अन्य नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी जागा अपुरू पडू शकते, असा चर्चेतील सूर होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला देहूच्या हद्दीत जागा मिळणार नसल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, गटनेते योगेश परंडवाल, नगरसेविका पूजा काळोखे यासह विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक उपस्थित होते. विठ्ठलवाडी बायपासनजीक नगरपंचायतीच्या हद्दीत सर्वे नं.97 मध्ये सुमारे 150 एकर शासजकीय गायरान जागा आहे. त्यापैकी काही एकरवर अतिक्रमण झाले आहे. चार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरुवातीला चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे त्यानंतर चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील महापालिकेच्या जागेत सुरू करण्यात आले. त्यामुळे आयुक्तालयासाठी अद्यापही जागेचा शोध सुरूच आहे. तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणानेदेखील आयुक्तालयाला जागा देऊ केली होती. मात्र. त्यानंतर हा विषय मागे पडला.
पोलीस आयुक्तालयाकरिता देहूतील 50 एकर शासकीय गायरान जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी झाल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. तर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील या जागेची पाहणी केली होती. अद्यापही आयुक्तालयाच्या जागेसाठी शोध सुरू आहे. तत्कालीन देहू ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ही गायरान जागा पोलीस आयुक्तालयाला देण्याचा प्रस्ताव ग्रामसभेच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला होता.
मात्र, ही ग्रामसभा तहकूब झाल्याने, त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. काही महिन्यांपूर्वी देहू ग्रामपंचायतीचे देहू नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. बुधवारी सर्वसाधारण सभेत आयुक्तालयाच्या जागेचा विषय ठेवण्यात आला होता. मात्र, वाढती लोकसंख्या व नागरीकरणामुळे नव्याने नागरी सुविधा विकसित करण्यासाठी या जागेची आवश्यकता भासणार असल्याचा सर्वच सदस्यांचा सूर होता.
देहू नगरपंचायतीच्या नामविस्ताराला मान्यता
दोन महिन्यांनी झालेल्या सर्व साधारण सभेमध्ये मागील सभेचा वृत्तांत वाचनासह सुमारे 35 विषयांवर हरकत, ना हरकती घेत विविध विषयांना मंजुरी देत चार तास सर्वसाधारण सभा सुरू होती. यामध्ये नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना शासकीय कामांकरिता वाहने भाडे तत्त्वावर उपलब्ध करून देणे तसेच देहू नगरपंचायतीच्या नावात बदल करून श्रीक्षेत्र देहू नगरपंचायत करणे. भक्त निवास येथील सुमारे साडेसहा लाखांचे थकीत वीज बिल अदा करणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य दौऱ्यानिमित्त विविध कामांचे नियोजन करण्याच्या विषयावर चर्चा करून अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली.