इस्रायल-हमासमधील संघर्ष शिगेला; गाझापट्टीत इस्रायलचे हल्ले वाढले

जेरुसलेम – इस्रायल आणि हमासमधील संघर्ष सध्या शिगेला पोहोचला असून, आज इस्रायलने गाझापट्टीत हल्ले करून हमासच्या गनिमांवरील कारवाई सुरूच ठेवली आहे. हमासच्या गनिमांनी वापरात आणलेल्या उंच इमारतींना इस्रायलच्या विमानांनी लक्ष्य केले. त्यात हमासचे तीन गनिम ठार झाले असल्याचे वृत्त आहे. पॅलेस्टाईनच्या हद्दीतूनही इस्रायलवर सतत रॉकेट हल्ले सुरू आहेत. इस्रायलकडून झालेल्या कारवाईला त्यांनी अजून तरी दाद दिली नसून त्यांच्या इस्रायल विरोधातील कुरापती सुरूच आहेत.

ही कारवाई अधिक व्यापक करण्याचा निर्धार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्‍तकेला आहे. काल रात्रीतूनही पॅलेस्टाईनच्या हद्दीतून हमासने इस्रायली हद्दीत जी रॉकेट्‌स डागली त्यातील काही रॉकेट्‌स तेल अव्हीव या गजबजलेल्या वस्तीच्या भागात येऊन पडली. त्यात तीन इस्रायली महिला ठार झाल्या आहेत. अन्य अनेक जण जखमी झाले आहेत, तर इस्रायलने गाझाच्या भागात केलेल्या हल्ल्यात 32 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. त्यात दहा मुलांचा समावेश आहे, तर तेथे अन्य दोनशे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, याच काळात इस्रायलच्या हद्दीत राहणाऱ्या अरबांनीही हिंसक निदर्शने सुरू केली असून, त्यांचाही तेथे पोलिसांशी संघर्ष सुरू आहे.

इस्रायल आणि हमासमध्ये सन 2014 मध्ये 50 दिवसांचा युद्धजन्य संघर्ष उद्‌भवला होता. सध्या जो संघर्ष उद्‌भवला आहे तो त्या काळाची आठवण करून देणारा आहे, असे संबंधित लोकांचे म्हणणे आहे. काल इस्रायली हद्दीत हमासकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर देशाला उद्देशून बोलताना नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, आपल्या हद्दीत त्यांनी केलेल्या हल्ल्याची त्यांना आम्ही किंमत मोजायला लावली असून, त्यांना अजून बरीच किंमत मोजावी लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.