अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसच्या पिछेहाटीची कारणमीमांसा करण्याची धुरा

नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसची पीछेहाट झाली. त्या पीछेहाटीची कारणमीमांसा करण्यासाठी पक्षाने मंगळवारी पाच सदस्यीय समितीची स्थापना केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना त्या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.

समितीच्या उर्वरित सदस्यांमध्ये सलमान खुर्शिद, मनिष तिवारी, विन्सेंट पाला आणि ज्योतीमणी यांचा समावेश आहे. त्या समितीला दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पश्‍चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुका झाल्या. कॉंग्रेसला पुदुच्चेरीची सत्ता गमवावी लागली. केरळ आणि आसाममध्ये अनुक्रमे डाव्या पक्षांनी आणि भाजपने सत्ता राखली. त्या राज्यांत कॉंग्रेसला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तर, बंगालमध्ये तो पक्ष खातेही उघडू शकला नाही. कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने तामीळनाडूची सत्ता मिळवली. मात्र, त्या विजयाचे बहुतांश श्रेय द्रमुकला दिले गेले. त्यामुळे विधानसभा निवडणुकांचे निकाल कॉंग्रेसच्या दृष्टीने निराशाजनकच ठरले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.