वॉशिंग्टन – भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या चार देशांनी चीनच्या वाढत्या प्रभावाच्या विरोधात जी क्वाड संघटना स्थापन केली आहे. त्यात सहभागी होण्याच्या संबंधात बांगलादेशानेही हालचाली सुरू केल्या आहेत. तथापि बांगलादेशाने असला कोणताही निर्णय घेऊ नये म्हणून चीनने बांगलादेशला धमकावण्याचा प्रकार घडला आहे.
एका चिनी राजनैतिक अधिकाऱ्याने बांगलादेशला गंभीर परिणामाचा इशारा देणारे वक्तव्य केले आहे. त्या धमकीची अमेरिकेने गंभीर दखल घेतली आहे. अमेरिकेच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रवक्ते नेद प्राईस यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे बांगलादेशाशी अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. आम्ही चीनच्या बांगलादेशातील राजदूताने केलेल्या वक्तव्याची दखल घेतली आहे.
बांगलादेशला स्वत:च्या परराष्ट्रीय धोरणानुसार निर्णय घेण्याचा किंवा भूमिका घेण्याचा अधिकार आहे. आणि त्यांचा सार्वभौमत्व जपलेच गेले पाहिजे असा आमचा आग्रह आहे असे अमेरिकेच्या विदेश व्यवहार विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. क्वाड संघटनेच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, इंडो-पॅसिफिक रिजन हा खुला असला पाहिजे तेथे कोणाचेही बेकायदेशीर प्रभुत्व असताकामा नये याच भूमिकेतून ही संघटना कार्यरत असून त्यात या भागातील ज्या लोकशाहींवादी देशांना येण्याची इच्छा आहे त्यांना आम्ही संधी देऊ शकतो.
काल बांगलदेशला धमकीवजा इशारा देताना चीनचे ढाक्यातील राजदूत लि जिमिंग यांनी म्हटले होते की बांगलादेशाने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील क्वाड संघटनेत सहभागी होता कामा नये अन्यथा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. दरम्यान चीनची ही भूमिका दुर्देवी आणि आक्रमक असल्याची टीका बांगलादेशचे विदेश मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मेमन यांनी केली आहे. आम्ही स्वायत्त आहोत आणि आमचे विदेश धोरण ठरवण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे याची जाणीवही बांगलादेशाने चीनला करून दिली आहे.