कलंदर: गुरू तो गुरूच

उत्तम पिंगळे

परवाच प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो असता एकूणच शिक्षण विषयावर चर्चा झाली. मग मीही त्यांना म्हणालो, एकूण शिक्षण पद्धतीचा दर्जा घसरला आहे. त्यावर प्राध्यापक म्हणाले, बरोबर आहे. अगदी शिक्षकांचाही आपण म्हणता त्याप्रमाणे दर्जा घसरला असे म्हटले तर त्याच्या किती तरी पट विद्यार्थ्यांचाही दर्जा घसरला आहे. मी त्यांना पूर्वीच्या शिक्षकांविषयी बोलत असताना सांगत होतो की, पूर्वीच्या शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असे. म्हणजे त्याच्या घरी कोण कोण आहेत. त्याचे वडील काय करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे याची सर्व माहिती असे. पूर्वीचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शंकेचे त्याच वेळी उत्तर देत. तास संपल्यावर सांगतो वा उद्या सांगतो असा प्रकार तेव्हा नव्हता.

प्राध्यापकांनी मग दीर्घ श्‍वास घेतला व मला म्हणाले, तुम्ही म्हणता त्यात थोडे तथ्य आहे; पण आजच्या विद्यार्थ्यांना तरी दर्जा काय आहे? पण तुम्हाला मी एक सांगतो की गुरू तो शेवटी गुरूच मग काळ कोणताही असो. मी तुम्हाला अलीकडच्या काळातील किस्सा सांगतो. एक विद्यार्थी 9वी झाल्यावर शाळा सोडून जातो. पुढे काही शिकत नाही. त्याला नोकरी मिळत नाही. मग त्याला कोणी तरी शिकवले की शाळेने तुला काही शिकवले नाही म्हणून तू असा आहेस. जा शाळेतून तुझी फी परत मागून घे. त्याप्रमाणे शाळेमध्ये तो जातो व मुख्याध्यापकांना सांगतो की, मला तुम्ही जगण्यालायक बनवले नाही. माझी फी परत करा. ते समजावतात, पण तो ऐकत नाही. शेवटी ते म्हणतात, ठीक आहे उद्या ये. तुला मी तीन प्रश्‍न विचारीन ते सर्व येतीलच कारण आम्ही तुला शिकवले आहे. पण एक जरी प्रश्‍न बरोबर आला तर तुला फी परत मिळणार नाही.

दुसऱ्या दिवशी विद्यार्थी येतो व मुख्याध्यापकांसह दोन कार्यकारी मंडळातील सदस्यही येतात. पहिला प्रश्‍न विचारतात की, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो? समोरून उत्तर येते, एक हजार पाचशे किलो. दुसरा प्रश्‍न विचारतात, मी दोन डझन आंबे घेतले त्यातील तीन खराब निघाले तर चांगले किती? क्षणात समोरून उत्तर येते, 45 सेंमी. मुख्याध्यापकांनी डोक्‍याला हात लावला व सदस्यांना म्हणाले की, याला पैसे परत करावे लागतील. मग त्याला विचारतात की शाळा तुझे किती देणे लागते? तो विद्यार्थी कागद काढतो त्यावर पूर्ण पहिली ते नववीपर्यंतच्या फी, पुस्तके, वह्या, स्टेशनरी यांचा सगळ्याचा हिशेब केलेला असतो. चाळीस हजार पन्नास रुपये व पन्नास पैसे एवढा तो असतो. तो कागद मुख्याध्यापकांना देतो व तो म्हणतो की, वरचे पन्नास रुपये व पन्नास पैसे सोडा. चाळीस हजार रुपये परत करा. हे ऐकताच मुख्याध्यापक म्हणतात, आता उठ आणि चालू लाग. कारण हाच माझा तिसरा प्रश्‍न होता की शाळा तुझे किती देणे लागते व ते तू अगदी बरोबर उत्तर दिले आहेस. वर पन्नास रुपये व पन्नास पैसे सूट देऊन व्यवहार कसा करावा याचीही समज तुला आहे. आता येथून निघ व अधिक मेहनत कर तीच तुझ्या कामी येईल. मग प्राध्यापक मला म्हणाले, काळ कोणताही असो शेवटी गुरू तो गुरूच.

Leave A Reply

Your email address will not be published.