नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत लिटरमागे पेट्रोल 25 पैशांनी; तर डिझेल 24 पैशांनी महागले.
सौदी अरेबियातील महत्वाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर शनिवारी ड्रोन हल्ले झाले. त्यामुळे सौदीतील कच्च्या इंधनाचे उत्पादन जवळपास निम्म्याने घटले. त्यातून सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनाचे दर 30 वर्षांत प्रथमच एका दिवसात 20 टक्क्यांनी वाढले. त्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर झाला आहे. भारताला गरजेच्या 83 टक्के कच्च्या इंधनाची आयात करावी लागते. त्यातील सौदीचा वाटा सुमारे एक-पंचमांश इतका आहे. त्यापार्श्वभूमीवर, भारताची राजधानी दिल्लीत मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे 14 आणि 15 पैशांनी वाढ झाली. ती दरवाढ केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरची (5 जुलै) सर्वांधिक ठरली. ताज्या दरवाढीने तिलाही मागे टाकले.