फलटण -फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी, खटके वस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत आहे. तेथे विक्रीची व्यवस्था नसल्याने हा कापूस कवडीमोल किमतीला विकावा लागतो. त्यामुळे फलटण येथे शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण, बारामती या तालुक्यांमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापसाचे क्षेत्र वाढत आहे; परंतु येथे विक्रीची व्यवस्था नसल्याने कापूस कवडीमोलाने विकावा लागत असल्याची बाब काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रामराजे यांच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन अथवा राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या माध्यमातून येथे शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
त्यावर, कापूस विक्रीची गडबड करू नका, शासकीय हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही रामराजे यांनी दिली. फलटण तालुक्यात गोखळी, साठे, सरडे, गुणवरे, ढवळेवाडी परिसरात यावर्षी 300 एकर क्षेत्रावर कापूस लागण झाली असून कापूस उत्पादन सुरू झाले आहे. शासकीय हमीभाव प्रतिक्विंटल 5800 रुपये असताना येथे केवळ चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
त्यामुळे येथे शासकीय कापूस खरेदी व प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यास कापसाला हमीभाव व शेकडो हातांना रोजगार मिळेल, असे शेतकऱ्यांनी रामराजे यांना सांगितले. त्यानंतर रामरजे यांनी संबंधित शासकीय यंत्रणेला तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. यावेळी आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, खटके वस्तीचे सरपंच बापूराव गावडे, श्रीराम साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजीराव गावडे, संचालक संतोष खटके, गोखळीच्या तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, नवनाथ गावडे-पाटील, योगेश गावडे-पाटील, राजेंद्र भागवत, योगेश जाधव उपस्थित होते.