भाजप जिल्हाध्यक्षांच्या दडपशाहीमुळे शेतकरी पीककर्जापासून वंचित
नगर – सहकाराचा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यात विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे साधे सभासदत्व मिळण्यासाठी शेतकऱ्यांना सरकार दरबारी दाद मागावी लागते. एवढे करूनही सेवा सोसायटी सरकारलाही कवडीमोल किमत देत असल्याचे चित्र शेवगाव तालुक्यात पिंगेवाडी गावात दिसत आहे. या सेवा सोसायटीने गावातील तब्बल 500 शेतकऱ्यांना सभासद करून घेण्यास नकार दिला आहे.
त्यामुळे या शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष हक्काच्या पीककर्जापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. तालुका सहाय्यक निबंधकापासून ते सहकार मंत्र्यापर्यंत शेतकऱ्यांनी दाद मागितली. सहकार खात्याने आदेश देवूनही सेवा सोसायटी या शेतकऱ्यांना सभासद करू घेत नसल्याने आता सरकारने देखील हात टेकले आहेत. भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्या अधिपत्याखाली पिंगेवाडी सेवा सोसायटी असून मुंडेंच्या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांना सोसायटीचे सभासदत्व मिळण्यासाठी झगडावे लागत आहे.
पिंगेवाडी सेवा सोसायटीने सभासद करून द्यावे, यासाठी गावातील सहा शेतकरी गेल्या वर्षभरापासून सहकार व सरकार दरबारी पत्रव्यवहार करीत आहे. पण त्यांना कोणालाही या सोसायटीने भिक घातली नाही. अविनाश तानवडे, दिपक तानवडे, अशोक जाधव, संगिता जाधव, गिता जाधव, मिराबाई जाधव या सहा शेतकऱ्यांनी सोसायटीने सभासद करून घेण्यासाठी थेट मुख्यमंत्री पोर्टलवर देखील तक्रार दाखल केली.
पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तालुका सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, नाशिक विभागीय सहनिबंधक, सहकार विभागाचे सचिव व थेट सहकारमंत्र्यापर्यंत केवळ सेवा सोसायटीने सभासदत्व द्यावे, या मागणीसाठी दाद मागितली. पण त्यांच्या पदरी निराशाच आली. सहकाराचा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना साधे सोसायटीचे सभासदत्व मिळत शक्य नाही.
ही एवढी मोठी दंडेलशाही पिंगेवाडी असल्याचे दिसत येत आहे. याबाबत अविनाश तानवडे यांनी सहकार खात्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सभासद करून घेण्यासाठी सहाय्यक निबंधकांनी आदेश दिला असतांनाही तो आदेश माझ्या अंगावर फेकून देण्यात आला आहे. नव्याने सभासद करून घेणे क्रमप्राप्त आहे. पण संस्थेचे अध्यक्ष व सचिवांच्या राजकीय द्ववेषापोटी व आडमुठ्या भूमिकेमुळे सभासद करून घेतले जात नाही.
याबाबत सहाय्यक निबंधक अनिल भांगरे यांनी सोसायटीला आदेश दिला आहे. या आदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 चे कलम 23 (2), अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार पिंगेवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला आदेश देतो की, अविनाश तानवडे यांचा सभासद अर्ज, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, सात-बारा उतारे, शेअर्स व प्रवेश फी ची रक्कम घेवून एक महिन्याच्या आत सभासद करून घेण्याचे स्पष्ट केले होते. 17 डिसेंबर 2019 रोजी हा आदेश दिला. मात्र अजूनही सभासद करून घेण्यात आले नाही. या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
याप्रमाणे गावातील सुमारे 500 शेतकऱ्यांना सभासदत्व नाकारले आहे. या गावाची लोकसंख्या 3 हजारपर्यंत असून सोसायटीचे 800 सभासद आहे. एकहाती सत्ता ठेवण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांनी या शेतकऱ्यांना सभासदत्व देण्याबाबत संस्थेवर दडपशाहीचा अवलंब केल्याचा आरोप या शेतकऱ्यांकडून होत आहे. मुंडे यांचे बंधू उदय मुंडे हे या संस्थेचे अध्यक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सभासदत्व मिळण्यास झगडावे लागत आहेत.
सहकार खात्याने सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांना शेतकऱ्यांना सभासद करून घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला सोसायटीने केराची टोपली दाखविली आहे. सहकार खाते आता हतबल झाले असून त्यांनी न्यायालयात जाण्याचे सुचविले असून त्यानुसार आता उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
अविनाश तानवडे , शेतकरी, पिंगेवाडी