कोपरगाव/राहाता – आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला परपुरुषासमवेत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली. ही घटना कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलीची आई व आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे (रा. वेस, ता.कोपरगाव) यांना राहाता पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सदर घटना पीडित मुलीच्या घरात सहा सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. राहाता पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा सर्व स्तरावर निषेध होतो आहे.
तालुक्यातील एका गावात इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला जन्मदात्या आईने आपल्या समाजाच्या चालीरीतीनुसार तुला आबासाहेब रामचंद्र भडांगे (रा. वेस, ता.कोपरगाव) याच्या समवेत संबंध ठेवावे लागेल, असे सांगितले. पीडित मुलीने सदर कृत्य करण्यास नकार दिला. बळजबरीने मुलीला भडांगे नावाच्या इसमाच्या ताब्यात दिले. भडांगे याने घरातील एका खोलीत अत्याचार केला. पीडित मुलीच्या नातेवाईकाने राहाता पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली.आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपअधीक्षक संजय सातव यांनी भेट दिली. पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड तपास करीत आहेत.