सातारा -खून करून फरार झालेल्या आणि त्या काळात आणखी पंधरा गुन्हे करून पोलिसांसमोर आव्हान उभ्या केलेल्या यश उर्फ नाना पाटेकर (रा.आसगाव, ता. सातारा, मूळ रा. फत्यापूर, ता. सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याला कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करून संशयित पाटेकर हा एक वर्ष फरारी होता. त्या काळात त्याने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या, ट्रान्सफॉर्मरमधील तारांच्या चोऱ्यांचे एकूण 15 गुन्हे केले. तो हाती लागत नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते.
त्याच्या मुसक्या आवळून उर्वरित गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सपोनि आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. पाटेकर याने कोरेगाव तालुक्यात घरफोड्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर साबळे व त्यांचे सहकारी त्याच्या मागावर होते.
तो काल (दि. 3) फत्यापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तेथे सापळा लावून त्याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडीची कबुली त्याने दिली. त्याला एसलीबीच्या कार्यालयात आणून पोलिसी खाक्या दाखवताच विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 15 घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली. पोलीस अधीक्षक बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे, रमेश गर्जे,
पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार कांतिलाल नवघणे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, आतिश घाडगे, शरद बेबले, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, रवी वाघमारे, नीलेश काटकर, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अमित सपकाळ, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, प्रवीण पवार, विजय सावंत, गणेश कचरे यांनी ही कारवाई केली.