मुंबई – मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील 90 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा नवीन वर्षात वाहतुकीस खुला करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.
मुंबई ते नागपूर अंतर केवळ आठ तासांत पार करण्यासाठी 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे काम हाती घेण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी 8861.02 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून यापोटी मोबदला म्हणून 7424.37 कोटी रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.
प्रकल्पातील सर्व टप्प्यांतील सविस्तर आराखड्याला पर्यावरणविषयक आणि वन विभागाची मंजुरी मिळाली आहे. टप्पा 2 आणि 5 मधील आराखड्यास वन्यजीव संरक्षण विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार सध्या सर्व टप्प्यांतील कामे प्रगतीपथावर आहेत.
या प्रकल्पात वन्य जीव संरक्षणावरही भर देण्यात आला आहे. त्यानुसार वन्य जीवांसाठी तीन भुयारी तर 3 उन्नत मार्ग बांधण्यात येत आहेत. यापैकी तीनही भुयारी मार्ग पूर्ण झाले असून एका उन्नत मार्गाचे काम पूर्ण झाले आहे, तर दोन उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. वाहनांसाठी बांधण्यात येत असलेल्या 65 उन्नत मार्गापैकी 13 मार्ग पूर्ण झाले असून 52 मार्गाचे काम सुरू आहे. तर वाहनांसाठीच्या 189 भुयारी मार्गापैकी 163 मार्ग पूर्ण झाले असून 26 मार्गाचे काम सुरू आहे. यासह अन्य कामेही प्रगतीपथावर आहेत.