कानपूर – भारतीय संघाने आपला दुसरा डाव 7 बाद 234 धावांवर घोषित केला. त्यात पहिल्या डावातील शतकवीर श्रेयस अय्यर व यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यांनी अफलातून अर्धशतके फटकावली. भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर पहिल्या कसोटीत विजयासाठी 284 धावा करण्याचे आव्हान ठेवले व चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांची अवस्था 1 बाद 4 अशी केली असून या सामन्यातील विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याची भारतीय संघाला संधी मिळाली आहे.
रविवारी चौथ्या दिवशी भारताने आपला डाव 1 बाद 14 वरून पुढे सुरू केल्यावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखले. त्यांनी भारताच्या प्रमुख फलंदाजांना अत्यंत स्वस्तात बाद करत एकवेळ 5 बाद 51 अशी बिकट अवस्था केली होती. सलामीवीर शुभमन गिल तिसऱ्याच दिवशी खातेही न उघडता तंबूत परतला होता. मयंक आग्रवालने 17, चेतेश्वर पुजाराने 22, कर्णधार अजिंक्य रहाणेने 4 अशी साफ निराशा केली. तर, पहिल्या डावातील अर्धशतकवीर रवींद्र जडेजाला खातेही उघडता आले नाही. त्याचवेळी पहिल्या डावातील शतकवीर श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा संयमी खेळाचे दर्शन घडवताना अर्धशतक फटकावले. त्याने रवीचंद्रन अश्विनसह डाव सावरताना संघाचे शतक फलकावर लावले.
रहाणे-पुजारा पुन्हा ढेपाळले
कर्णधार अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना अद्याप अपयशातून बाहेर पडता आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत या दोघांनाही पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहलीने विश्रांती घेतल्यामुले पहिल्या कसोटीत रहाणेकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असले तरीही त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात त्याने 35 तर दुसऱ्या डावात केवळ 4 धावा केल्या. 2017 सालापासून रहाणे घरच्या मैदानावर 28 पैकी 20 वेळा फिरकी गोलंदाजांविरुद्ध बाद झाला आहे. पुजाराने पहिल्या डावात 26 तर दुसऱ्या डावात 22 धावा केल्या. पुजारा व रहाणे सध्याच्या भारतीय संघातील सर्वात तंत्रशुद्ध फलंदाज मानले जातात मात्र, गेल्या तीन ते चार मोसमांपासून त्यांना सातत्याने अपयश येत असल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका होत असून न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून त्यांना वगळले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
अश्विन चांगला खेळत असताना 32 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने अय्यरला सुरेख साथ दिली. या जोडीने 7 व्या गड्यासाठी 64 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करताना संघाला दीडशतकी मजल मारून दिली. दरम्यान अय्यर अर्धशतक झाल्यावर वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात 65 धावांवर बाद झाला. साहानेही संयमी खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अक्सर पटेलला हाताशी घेत संघाचे द्विशतक फलकावर लावले.
पटेलनेही जिद्दी खेळाचे दर्शन घडवताना 28 धावांची नाबाद खेळी केली. त्यात त्याने 67 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावला. साहा 126 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावून 61 धावांवर नाबाद राहिला. संघाकडे 283 धावांची आघाडी असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने दुसरा डाव घोषित करत न्यूझीलंडसमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले. न्यूझीलंडकडून टीम साउदी व काएल जेमिसन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. एजाज पटेलने 1 बळी घेतला.
दिवसातील अवघ्या 4 षटकांचा खेळ बाकी असताना न्यूझीलंडने आपला दुसरा डाव सुरू केला. पहिल्या डावात भक्कमपणे फलंदाजी करणारा विल यंग या डावात मात्र, अपयशी ठरला. त्याला केवळ अश्विनने पायचित केले व पाहुण्यांना धक्का दिला. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या 1 बाद 4 धावा झाल्या असून त्यांना विजयासाठी 280 धावांची गरज आहे. तर, भारतीय संघ या विजयासह मालिकेतही अजिंक्य आघाडी घेण्यापासून नऊ पाऊले दूर आहे. दिवसअखेर टॉम लॅथम 2 तर, विल्यम सुमेरविल्स 0 धावांवर खेळत आहेत. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने 3 धावा देत 1 गडी बाद केला.
साउदी-जेमीसनवर वर्चस्व
भारताच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्यानंतर श्रेयस अय्यर व वृद्धिमान साहा यांच्यासह रवीचंद्रन अश्विन व अक्सर पटेल यांनी जिद्दी फलंदाजी केली. त्यांनी चेतेश्वर पुजारा, कर्णधार अजिंक्य रहाणे, मयंक आग्रवाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा यांना या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची याचेच धडे दिले. या खेळपट्टीवर गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नसतानाही अत्यंत बेजबाबदार पद्धतीने भारतीय फलंदाजांनी आपल्या विकेट गमावल्या. मात्र, अय्यर, साहा, अश्विन व अक्सर यांनी टीम साउदी आणि काएल जेमिसन यांच्यावर वर्चस्व राखत डाव सावरला.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 386. न्यूझीलंड पहिला डाव – 296. भारत दुसरा डाव – 81 षटकांत 7 बाद 234 धावा घोषित. (मयंक आग्रवाल 17, चेतेश्वर पुजारा 22, अजिंक्य रहाणे 4, रवीचंद्रन अश्विन 32, श्रेयस अय्यर 65, वृद्धिमान साहा नाबाद 61, अक्सर पटेल नाबाद 28, काएल जेमिसन 3-40, टीम साउदी 3-75, एजाज पटेल 1-60). न्यूझीलंड दुसरा डाव – 4 षटकांत 1 बाद 4 धावा. (विल यंग 2, टॉम लॅथम खेळत आहे 2, विल्यम सुमेरविल्स खेळत आहे 0, रवीचंद्रन अश्विन 1-3).