शिराळा – शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत इनामवाडी, ता. शिराळा येथील घर व जनावरांचा गोठा जळून खाक झाला आहे. या घटनेत प्रकाश चव्हाण व विकास चव्हाण यांचे एक लाखाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक माहिती अशी की, प्रकाश नामदेव चव्हाण व विकास नामदेव चव्हाण यांचे तीन आखणीचे घर आहे.
त्यास लागून जनावरांचा गोठा आहे. सकळी 9 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागली. शेडमध्ये गवत असल्याने आगीने भडका घेतला. धुराचे लोट वाहू लागले. आग लागल्याचे दिसताच घरातील लोकांनी आरडाओरडा केला. यावेळी वाडीतील संदीप चव्हाण, नागेश चव्हाण, जोती चौगुले, प्रकाश पाटील, हरेश चौगुले, संजय चव्हाण, संतोष चव्हाण, सचिन चव्हाण, संजय पाटील, राहुल चौगुले, सौरभ चौगुले, सचिन पाटील, संजय घोडवील या तरुणांच्यासह ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी एकत्रित येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
निनाई देवी दालमिया भारत शुगर युनिट निनाईदेवी साखर कारखान्याच्या टॅंकरने पाणी आणून दोन तासांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली. ही आग वेळीच आटोक्यता आणली नसती तर आजूबाजूला घरे होती. ती जळून खाक झाली असती. या आगीत कौले, रिपा, वासे, गवत, धान्य जाळून खाक झाले. प्रकाश यांचे 49 हजार 50 रूपये तर विकास यांचे 51 हजार 825 असे एकूण एक लाख 875 रुपये नुकसान झाले आहे. पंचनामा तलाठी मोहन शिरसे यांनी केला. यावेळी उपसरपंच सदाजी पाटील, ग्रा. प. सदस्य रामभाऊ बडडे, विष्णू पोतदार, विश्वनाथ देशपांडे उपस्थित होते.