न्यूयॉर्क – वेगवेगळ्या तीन देशांमधील चार नागरी अंतराळवीर येत्या शुक्रवारी अमेरिकेतील केनेडी स्पेस सेंटरवरून अंतराळ केंद्राकडे झेपवणार आहेत. चौघेजण दहा दिवस अंतराळातील केंद्रात राहणार असून अंतराळातील प्रवासाचा मेंदू आणि हृदयावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र हे अंतराळवीरांसाठी तेथील घर मानले जाते. आता त्याठिकाणी पर्यटक असणारे नागरी अंतराळवीरही जाणार आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून या चार नागरी अंतराळवीरांना घेऊन स्पेसएक्स फाल्कन-9 हे प्रक्षेपक झेपावणार आहे. नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने त्यांच्या प्रयोगशाळेचे व्यावसायिकरण करण्याचे ठरवले असून त्यानुसार आता पैसे घेऊन पर्यटकांना अंतराळात फिरवून आणले जाणार आहे. फ्लोरिडातील स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी 11.17 वाजता या प्रक्षेपकाचे उड्डाण होणार आहे. त्यामध्ये मायकेल लोपेझ-अल्जिरिया, पायलट लॅरी कॉनर आणि या मोहिमेतील तज्ज्ञ आयटन स्टिब्बे आणि मार्क पॅथी यांचा समावेश असणार आहे.
यातील लोपेझ-अल्जिरिया हे 63 वर्षांचे स्पेनचे नागरिक आहेत. ते मोहिमेचे प्रमुख असतील. ते पारंपारिक आणि व्यावासायिक क्षेत्रात काम करणाऱ्या अंतराळ कंपन्यांचे स्वतंत्र सल्लागार म्हणून काम करतात. त्यांच्याबरोबर 70 वर्षांचे लॅरी कॉनर असणार आहेत. ते रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करतात. ते वैमानिकही आहेत. त्यांच्याबरोबर इस्रायलमधील गुंतवणूकदार- सामाजिक कामांसाठी दान करणारे लष्करी लढाऊ विमानांचे पायलट म्हणून काम केलेले 64 वर्षांचे आयटन स्टिब्बे असणार आहेत.
त्याचबरोबर कॅनडातील व्यावसायिक आणि दान करणारे 52 वर्षीय मार्क पॅथी या मोहिमेत असतील. हे चारही अंतराळवीर विविध क्षेत्रात काम करणारे आहेत. श्रीमंत आहेत, कोट्याधीश वर्गातील आहेत. त्यामुळेच आम्ही अंतराळात जाणारे पर्यटक नाही, असे स्पष्टीकरण लोपेझ-अल्जिरिया यांनी दिले आहे. हे चौघेही अंतराळ केंद्राच्या विविध संशोधन उपक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत.