तळमावले, दि. 17 (वार्ताहर) -तळमावले, ता. पाटण भागातील 16 पोलीस पाटीलांच्या मानधन वाढीसह इतर मागण्यांसाठी शेंडेवाडीचे पोलीस पाटील संतोष पवार व रामिष्टेवाडीचे पोलीस पाटील बजरंग रामिष्टे यांनी पाटण गुरुवारपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरु केले आहे. यामध्ये तालुक्यातील पोलीस पाटील साखळी उपोषणाने सहभाग नोंदवणार आहेत.
शासन आणि गाव यामधील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील आपआपल्या गावामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून पोलीस पाटीलांना तुटपुंजे मानधन, तेही कधी वेळेवर महिन्याचे महिन्याला मिळालेले नाही. काही महिन्यांपूर्वी आशा व अंगणवाडी सेविका, कोतवाल, कंत्राटी शिक्षक आदींच्या मानधनात शासनाने वाढ केली. परंतु, पोलीस पाटीलांना मानधन वाढ अद्याप दिलेली नाही. याप्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदरचे बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. याला भागातील पोलीस पाटलांनी पाठिंबा दिला.