नवी दिल्ली-देशातील करोनाची तिसरी लाट ओसरू लागल्याचे चित्र आहे. देशभरात रविवारी अवघे 19 हजार 968 नवे बाधित आढळले. त्यामुळे बाधित संख्येची दैनंदिन वाढ 51 दिवसांच्या कालावधीनंतर 20 हजारांखाली गेली.
देशातील सक्रिय बाधितांची संख्या घटून 2 लाख 24 हजार 187 इतकी झाली आहे. ते प्रमाण एकूण बाधित संख्येच्या केवळ 0.52 टक्का इतके आहे. देशातील बाधित बरे होण्याचा दर वाढून 98.28 टक्क्यांवर पोहचला आहे. दैनंदिन बाधित दरही अवघा 1.68 टक्के इतका आहे. देशातील एकूण बाधित संख्या 4 कोटी 28 लाखांवर गेली आहे.
त्यातील 4 कोटी 20 लाखांहून अधिक बाधित आतापर्यंत बरे झाले आहेत. एकीकडे बाधितांची घटती संख्या आणि दुसरीकडे वाढणारे लसीकरण देशासाठी दिलासादायक ठरत आहे. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या करोनालसींच्या एकूण डोस संख्येने शनिवारीच 175 कोटींचा टप्पा ओलांडला. पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत डोस संख्येत देश आरामात 200 कोटींचा पल्ला गाठू शकेल.